नाशिक : सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दालन करा, असा सामाजिक संदेश देणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी गंगापूररोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्याच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. हजारो नाशिककरांनी मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने पारंपरिक पोषाख परिधान करून या सोहळयात सहभागी होऊन जवळपास एक लाखाहून अधिक दिवे प्रज्विलत केले. या दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर आणि संपूर्ण परिसर एका अनोख्या झळाळीने न्हाऊन निघाला होता.त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशीविवाह आणि कार्तिक महोत्सव या धार्मिक कार्यक्रमांच्या त्रिवेणी सोहळ्यानिमित्त शहरभरात भाविकांची मांदियाळी आणि दीपोत्सवाचा लखलखाट दिसून आला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. शिव मंदिरात वाती लावणो, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे अशाप्रकारे ही पौर्णिमा साजरी करण्यात येते. परंतु नाशिकमध्ये बालाजी मंदीरातही हा दिपोत्सव साजरा केला जात असून 12 वर्षापासून येथे दिवे प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. सुरुवातीला पाच हजार पणत्यांनी सुरुवात झोलेल्या या दिपोत्सवात आता एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले जात आहेत. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बक्षी व गलानी देवी यांच्या हस्ते प्रथम दिप प्रज्वलन करून दिपोत्सवाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर एकामागून एक येणाऱ्या नाशिककरांनी जवळपास 45 डब्बे तेल वापरून लाखो दिवे प्रज्वलित केले. तर काही महिलांनी एकत्रित हजारो वाती पेटवूनही पूजा केली. बालाजी मंदिराचा गाभारा व मंदिराची सजावट पणत्यांनी करण्यात आली होती. हळूहळू अवघा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने झळाळून निघाला.
सज्जनांचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन करण्याचा संदेश देण्यासाठी नाशिककरांनी पेटलविल्या लक्ष लक्ष वाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 9:21 PM
पारंपरिक पोषाख परिधान करून हजारो नाशिककरांनी भक्तीभावाने त्रिपुरारी पौणिर्मेच्या सोहळयात सहभागी होऊन एक लाखाहून अधिक दिवे प्रज्विलत केले
ठळक मुद्देनाशिककरांनी केले एक लाखाहून अधिक दिवे प्रज्विलत पारंपरिक पोषाख परिधान करून या सोहळयात सहभागबालाजी मंदिराचा गाभारा व मंदिराची पणत्यांनी सजावट