नाशिक : आरोग्य अन् शांततेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी (दि़१२) आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर पीस’ मॅरेथॉन स्पर्धेत अकरा हजाराहून अधिक नाशिककर धावले. अर्धमॅरेथॉनच्या २१ किलोमीटरच्या पुरुष गटात रणजित पटेल, महिलांच्या गटात संजीवनी जाधव, तर १० किलोमीटरच्या गटात आंतरराष्ट्रीय धावपटू किसन तडवी, महिला गटात पूनम सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला़ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्रामसिंह व सिनेअभिनेत्री सायली भगत मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण होते़ दरम्यान, पुढील वर्षापासून अर्धमॅरेथॉनऐवजी ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन होणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी यावेळी जाहीर केले़पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या उपक्रमास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला़ एकीकडे सकाळची हुडहुडी भरविणारी थंडी तर दुसरीकडे झुंबा डान्स, भांगडा नृत्य यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हजारो स्पर्धकांच्या उत्साहात चांगलीच भर पडली़ मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धकांकडून झुंबा डान्सद्वारे वॉर्मअप करून घेण्यात आला़ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्रामसिंह यांनी सकाळी साडेसहा वाजता पुरुष व महिलांच्या २१ कि.मी. अंतराच्या स्पर्धेला झेंडा दाखविला़ यानंतर सकाळी ६़५० वाजता सिनेअभिनेत्री सायली भगत हिने १० किलोमीटरच्या महिला व पुरुष गटाला तर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने सकाळी ७़१५ वाजता ५ किलोमीटरच्या महिला व पुरुष गटाच्या स्पर्धेचे झेंडा दाखवून उद्घाटन केले.एकीकडे मॅरेथॉन स्पर्धा तर दुसरीकडे गोल्फ क्लब मैदानावर झुंबा डान्स, जल्लोष ढोल पथकाचे सादरीकरण, भांगडा नृत्य यामुळे या स्पर्धेदरम्यान आनंदी वातावरण तयार झाले होते़ भोसला महाविद्यालयाच्या रणजित पटेल याने पुरुषांच्या २१ कि.मी. गटातून सहभागी होत हे अंतर १ तास ७ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला़ तर २१ किलोमीटरच्या महिला गटात संजीवनी जाधव हिने १ तास २७ मिनिटांत हे अंतर पूर्ण केले़ १० किलोमीटरच्या पुरुष गटात किसन तडवी याने हे अंतर ३२़३१ मिनिटांत पूर्ण केले. गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा मायको सर्कल, एबीबी सर्कल, सातपूर पोलीस ठाणे चौक, पपयाज् नर्सरी, पिंपळगाव बहुला आणि हॉटेल संस्कृती येथून यू-टर्न घेऊन पुन्हा गोल्फ क्लब मैदान असा समारोप झाला.विजेत्यांना शानदार समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात आली. कुस्तीपटू संग्रामसिंह, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, सिनेअभिनेत्री सायली भगत, अपर पोलीस महासंचालक व तत्कालीन पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, ग्रामविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी विजेत्यांचा सत्कार करून परितोषिके दिली.यावेळी क्रिडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम क्रिडा प्रशिक्षक विजेंद्र सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मटकरी आणि परी जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)‘.
‘रन फॉर पीस’साठी धावले नाशिककर
By admin | Published: February 13, 2017 12:28 AM