नाशिक : रेडी स्टेडी गो... !! असे म्हणत हजारो नाशिककर सकाळच्या गुलाबी थंडीत समाज कार्याच्या उद्देशाने शनिवारी (दि.९) ‘नाशिक रन’मध्ये सहभागी झाले होते. महात्मानगर मैदानापासून या रनसाठी सुरुवात करण्यात आली. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत अनेक नाशिककर या रनमध्ये सहभागी झाले होते. सकाळी ७.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातीला झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थित नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात स्वच्छ नाशिक आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवाहन करण्यात आले. या रनमध्ये सामान्यांप्रमाणेच विशेष विद्यार्थी आणि नागरिकांचादेखील सहभाग बघायला मिळाला. या रनसाठी सर्वसामान्यांसाठी ४.५ कि.मी., लहान मुलांसाठी २.५ कि.मी.चा मार्ग निश्चित करण्यात आला होता. महात्मानगर क्रिकेट मैदान, जेहान सर्कल, मॉडेल कॉलनी मार्गे पुन्हा महात्मानगर या मार्गावर ही रन घेण्यात आली. यंदाच्या नाशिक रनमध्ये जवळपास वीस हजारांहून अधिक टी शर्टची विक्री झाली आणि या टी शर्टमधून संकलित झालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे नाशिक रनतर्फे सांगण्यात आले.यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या नाशिक रनचे १४ वे वर्ष होते. नाशिकचे सायकलपटू हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन बंधूंच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून या रनचे उद्घाटन करण्यात आले, तर नाशिकचे महापौर अशोक मुतर्डक यांनी रॅलीला झेंडा दाखवून या शुभारंभ केला. यावेळी पोलीस उपआयुक्त एन अंबिका, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, महिंद्राचे हिरामण आहेर, एच. पी. थाँटेस, राजाराम कासार, सुधीर येवलेकर, अनिल पैठणकर, मोहन पाटील, अद्वैत खेर, उत्तरा खेर, सलील राजे, सौमित्र भट्टाचार्य, एन. बालकृष्णन् आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाजऋ णाच्या भावनेने धावले नाशिककर
By admin | Published: January 10, 2016 12:10 AM