नाशिक- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित वादग्रस्त विधान प्रकरणी नाशिकचे सावरकर प्रेमी तथा निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिकच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.
न्यायालयाने भुतडा यांचा जबाब नोंदवला असून पुढील सुनावणी 16 मार्चला होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ रोजी हिंगोली येथे तर १७ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला येथील सभेत सावरकर यांच्यावर टीका केली होती सावरकर हे केवळ दोन-तीन महिने जेलमध्ये होते तसेच सदाशिव रानडे नामक आपल्या एका सहकाऱ्यामार्फत त्यांनी स्वतःचे जीवन चरित्र लिहून घेतले आणि स्वतःला स्वातंत्र्यवीर अशी पदवी लिहून घेतली अशी टीका राहुल गांधींनी केली होती त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी राहुल सावरकरांचे संबंध असल्याचाही आरोप केला होता. या संदर्भात निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी एडवोकेट मनोज पिंगळे यांच्यामार्फत राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नाशिकच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमान येथील कारागृहात तब्बल बारा वर्षे होते ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे राहुल गांधी यांचा दावा चुकीचा आहे स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांनी स्वतः सहकाऱ्याकडून देऊन घेतली, याचेही कोणते पुरावे आढळत नाहीत त्याचप्रमाणे सावरकर हयात असताना भाजपची स्थापना देखील झाली नव्हती, सावरकर यांचा हिंदू महासभा हा स्वतंत्र पक्ष होता त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन असून त्यांच्या विधानामुळे सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी किंवा केलेल्या आरोपा संदर्भात पुरावे सादर करावे अशी मागणी पुतळा यांनी न्यायालयात केली आहे.