नाशिक : आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली कधीही साथ सोडत नसते; मात्र सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो. सूर्यकिरणे डोक्यावर पडत असल्यामुळे प्रत्येक उभ्या वस्तूची सावली ही पायाजवळ पडते अथवा अदृश्यही होते. नाशिककरांनाही असाच काहीसा अनुभव आज दुपारच्या सुमारास येणार आहे. मुंबई, कल्याण, अहमदनगर, जालना, पुणे या शहरानंतर नाशिकमध्ये रविवारी (२०) शून्य सावलीचा दिवस अनुभवयास येणार आहे. नाशिककरांमध्ये झिरो शॅडो डे विषयी कुतूहल असल्याने रविवारचा दिवस नाशिककरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यंदाचा शून्य सावलीचा दिवस हा उत्तरायण प्रवासामधील असून, पुढील सहा महिन्यांनंतर जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होईल, तेव्हा पुन्हा असा दिवस अनुुभवयास येण्याची शक्यता आहे. नाशिकचा अक्षांश वीस अंश इतका असल्याने सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी व त्यानुसार सूर्य मध्यावर येण्याचा दिवस प्रत्येक शहरात वेगवेगळा असू शकतो. त्यानुसार नाशिकमध्ये रविवारी हा रोमांचकारी अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. रविवारी दुपारी पावणेबारा ते एक वाजेच्या दरम्यान सूर्यकिरणे मध्यावर येतील आणि प्रत्येक उभ्या वस्तूची सावली ही थेट त्याच्याजवळच पायथ्याला पडेल किंवा गायबदेखील होऊ शकते. पृथ्वीची परिक्रमा सूर्याभोवती सुरू असते; मात्र तिचा अक्ष हा परिक्रमेच्या कक्षास लंब स्वरूपात नसतो. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन घडते. दररोज क्षितिजावरची सूर्याची जागा (सूर्योदय-सूर्यास्त) बदलत असते. २३ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू राहणार आहे.यंदाचा शून्य सावली दिवस हा सूर्याच्या उत्तरायणामधील आहे. नाशिकचा अक्षांश हा वीस इतका असल्यामुळे पुण्यानंतर रविवारी नाशिकमध्ये हा दिवस येत असून, हा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. दुपारी पावणेबारा ते एक वाजेपर्यंत हा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. याबरोबरच औरंगाबादमध्येही हा अनुभव रविवारी येणार आहे कारण औरंगाबादचाही अक्षांशही नाशिकच्या जवळपास आहे. सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा शून्य सावली दिवस येऊ शकतो.- अपूर्वा जाखडी, नासा स्पेस एज्युकेटर, नाशिक
आज सावली सोडणार नाशिककरांची साथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:03 AM