नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या अनेक दिवसांपासून पाणीकपातीची चर्चा सुरू आहे. पाणीकपात होणार की टळणार या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रोषाला सामोरे जायला नको म्हणून महापालिका प्रशासन पाणी कपातीचा निर्णय घेणे टाळत असली तरी हा निर्णय घेण्यास जेवढा उशीर होईल तेवढे नंतर जादा प्रमाणात पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. सद्यस्थितीत १८ दिवसांचा शाॅर्टफाॅल असून चर न खोदल्यास उन्हाळ्यात हमखास पाणी कपात लागू करावी लागेल. चर खोदण्याबाबत मनपा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.
समन्यायी पाणी वाटप निर्णयानुसार नाशिकमधील गंगापूर व दारणा समूहातून तीन टीएमसी पाणी जायकवाडीला सोडायला लागले. परिणामी नाशिककरांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली. मनपाने जलसंपदाकडे वर्षभरासाठी ६१०० दलघफू पाण्याची मागणी केली होती. मात्र त्यापैकी ५३०० दलघफू पाणी मंजूर करण्यात आले. त्यामुळे पाचशे दलघफू पाण्याची कमतरता आहे. मनपासमोर उपलब्ध जलसाठ्यात ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागविण्याची कसरत करावी लागणार आहे. जलसंपदाने गंगापूर धरणातील ६०० दलघफू मृत जलसाठा वापरण्यास परवानगी दिली असली तरी हे पाणी वापरण्यासाठी चर खोदावा लागेल. त्याशिवाय हे पाणी वापरता येणार नाही. ५३०० दलघफू पाण्याचा विचार केला तर त्यात वर्षभर नाशिककरांची तहान भागवायची असेल तर १८ दिवसांचा तुटवडा निर्माण होत आहे. मनपाकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यास जेवढी टाळाटाळ केली जाईल तेवढा हा शाॅर्टेज वाढत जाणार आहे.चर खोदण्याचा सल्ला
गंगापूर धरणातील सहाशे दलघफू मृत जलसाठा वापरण्यासाठी मनपाने धरणात चर खोदावा असा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र तरी देखील मनपाकडून चर खोदण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. जेव्हा उन्हाळ्यात पाणी टंचाई भीषण होईल तेव्हा मनपाला चर खोदण्यास जाग येईल अशी शक्यता आहे.