नाशिक : कारगिल युद्धानंतर प्रथमच नागरी भागातून सैन्यदलाच्या तोफांची वाहतुक नाशिकमध्ये दिसून येणार आहे. निमित्त आहे, नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राच्या (आर्टीलरी सेंटर) राज्यस्तरीय दोन दिवसीय शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) ईदगाह मैदानावर करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी पुर्णत: खुले राहणार असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल संतोष पांडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या देशाच्या सैन्यदलाचे सामर्थ्य लक्षात यावे आणि शक्तीशाली आधुनिक शस्त्रांस्त्रांचे याचि देही याचि डोळा दर्शन घडावे, या उद्देशाने भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशानुसार तोफखाना केंद्राकडून अशाप्रकारचे पहिले लष्करी शस्त्रास्त्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन नाशिकमध्ये भरविण्यात येत आहे. तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन पार पडणार आहे. केंद्रातील द्रोणाचार्य सभागृहात गुरुवारी (दि.१६) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी पांडा यांच्यासह बॅन्ड पथकाचे प्रमुख कर्नल सुनीलचंद्रन, अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा, सुभेदार कैलास दळवी उपस्थित होते.
यावेळी पांडा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथमच अशाप्रकारचे सैनिकी शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन नागरी वस्तीतील मैदानावर होत आहे. यानिमित्ताने नाशिकसह संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टीम, भुदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स, अश्वारूढ सैनिकांकडून दाखविले जाणारे सैनिकी प्रात्याक्षिकांसह तोफखाना केंद्राच्या विशेष बॅन्ड पथकाच्या गीतगायन-वादनाचा अनुभव घेता येणार आहे. रविवारी (दि.१९) रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
या तोफा बघण्याची संधीकारगिल विजयात सिंहाचा वाटा ठरलेली बोफोर्स, स्वदेशी बनावटीची आधुनिक धनूष, हलकी होवित्झर (एम-७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम), हलकी तोफ (१०५एमएम), उखळी मारा करणारी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम२१), लोरोस रडार सिस्टीमसह अशा तब्बल १९ लहान-मोठ्या तोफा नागरिकांना बघण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासह भुदलातील सैन्याकडे असलेल्या आधुनिक रायफल्स, मशिनगनदेखील प्रदर्शित केल्या जाणार आहे.