नाशिक : ओझरखेड धरणावरील मित्राची बर्थ डे पार्टी आटोपून नाशिकला परतणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास म्हसरूळ - दिंडोरी रोडवरील हॉटेल राणाजवळ घडली़ गौरव चैत्राम कापडणीस (२३, रा़ अंबिका स्टीलमागे, सोयगाव, मालेगाव) व पवन सुदाम पाटील (२२, रा़ गोराडखेडे, ता़पाचोरा़ जि़जळगाव) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे असून हे दोघेही शहरातील केक़े़वाघ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ दरम्यान, या दोघांच्याही नातेवाईकांनी घातपाचा संशय व्यक्त केला आहे़
गौरव चैत्राम कापडणीस
पवन सुदाम पाटील
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव व पवन या दोघांच्याही मित्राच्या वाढदिवस असल्याने सात ते आठ मित्रांसाठी ओझरखेड धरणावर बर्थ डे पार्टी ठेवण्यात आली होती़ आपल्या स्प्लेंडर दुचाकीने (एमएच १५, बीयु ६३७५) हे दोघेही पार्टीसाठी ओझरखेड धरणावर गेले होते़ पार्टी आटोपून नाशिकला येत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील हॉटेल राणाजवळ अज्ञात वाहनाने या दोघांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला़ यामध्ये दुचाकी चालवित असलेला गौरव व त्याच्या पाठिमागे बसलेला पवन या दोघाचेही डोके छातीस जबर मार लागल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला़ तर पवन यास १०८ मोबाईलमधील डॉ़शिल्पा पवार यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ बोरा यांनी मयत घोषीत केले़
दुचाकीला झालेल्या अपघातानंतरी जवळपास सुमारे दीड तास हे दोघेही रस्त्यावर पडून होते़ या दोघांच्या नातेवाईकांनी अपघातसमयी त्यांचे मित्र व दुचाकीबाबत शंका उपस्थित केल्या असून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान, या प्रकरणी अशोक रामा शिंदे (रा. श्रीजी अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नातेवाईकांना घातपाताचा संशयया अपघाताबाबत मयत गौरव व पवन यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अपघाता झाला त्यावेळी त्यांचे मित्र कोठे होते? अपघातग्रस्त स्प्लेंडर दुचाकी मित्र कुठे धेऊन गेले होते? घटनास्थळावरून दुचाकी का नेण्यात आली? गाडीचे किरकोळ नुकसान असताना या दोघांचा मृत्यू कसा झाला? असे एक ना अनेक आक्षेप मयतांच्या नातेवाईकांनी उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे़