नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारात १५ मे रोजी सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच खून करणाऱ्या सिडकोतील तिघा संशयितांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ खून झालेल्या इसमाचे नाव बाळू अशोक मोरे (रा. अंबडगाव शिवार) असे असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करीत होता़ वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या रागातून संशयित अजिंक्य भागवत पाटील (२३, रा. शिवशक्ती चौक), पंकज रामदास देशमुख (२३) व योगेश पोपट अहिरे (२३, दोघे रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी मोरेचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव सदो शिवारातील नारायण भागडे यांच्या शेतात १५ मे २०१८ रोजी एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी या खुनाचा तपास करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शोध घेतला असता अंबड परिसरातून बाळू मोरे नावाची व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली़
पोलिसांनी या माहितीनुसार तसेच खब-यांकडून मिळविलेल्या माहितीत १४ मे रोजी बाळू मोरे हा तीन तरुणांसोबत बाहेर गेल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन संशयित अजिंक्य, पंकज आणि योगेश या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मोरे यास कारमध्ये बसवून दारू पाजून डोक्यात फरशी मारून खून केल्याची कबुली दिली़ या तिघांनी गुन्ह्यात वापरलेली कार व पुरावेही पोलिसांनी जप्त केले आहेत़ मयत बाळू मोरे विरोधात पंचवटी व वणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली़
अजिंक्यचा मोरेसोबत वादलेबर कॉन्ट्रॅक्टर बाळू मोरे हा पोलिसांनी अटक केलेला अजिंक्य पाटील याचे वडील भागवत पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी कामास होता़ वारंवार पैशांची मागणी करून वडिलांना दमदाटी करणा-या मोरेसोबत अजिंक्यचा वादही झाला होता़ या वादानंतर अजिंक्यने मित्र पंकज व योगेशसोबत प्लॅन रचला व बाळूला दारू पाजून इगतपुरीला नेले़ या ठिकाणी एका शेतात बाळूच्या डोक्यात फरशी मारून त्याचा खून केला व पसार झाले़- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, ग्रामीण