नाशिक: शहरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजयंत्रणा विस्कळीत झाली. यामुळे नाशिककरांना सुमारे दिड ते दोन तास अंधारात काढावे लागले. वीजखांबावरील इन्सुलेटर फुटल्यामुळे खंडीत झालेला वीजप्रवाह सुरू करण्यासाठी जनमित्रांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.रविवारी सायंकाळी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणा कोलमडून पडली तर अनेक ठिकाणी विद्युत तारा निखळल्याने शहरातील वीजयंत्रणा विस्कळीत झाली. वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाºयामुळे विद्युतखांबावरील इन्सुलेटर फुटून वीजप्रवाह खंडीत झाला तर अनेक भागांमध्ये वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसानीत अधिकच भर पडली. पावसामुळे ११ केव्ही सिन्नर फिडर, चेहडीगाव येथील पॉलिटेक्निक ११ फिडर ब्रेकडाऊन झाल्याने सामनगाव, पंचक, एकलहरेरोड, चेहडीगाव येथील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तसेच गंजमाळ, सातपूर, मखमलाबाद फिडर, अशोकनगर, मुंगसरा, दरी, मातोरी, गंगापूरगाव,सदगुरू नगर, तिडके कॉलनी आदि भागात विद्युतवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नाशिककरांना दिड ते दोन तास सुरळीत वीजुपरवठ्याची प्रतीक्षा करावी लागली.
वीजतारांवर फांद्या पडून यंत्रणा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 8:35 PM