नाशिक: पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाईल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टींग करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या सर्व हालचालींवर निवडणूक अधिकारी कार्यालयात बसून लक्ष ठेवणार आहेत.निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार मतदान केंद्रांवर पुर्णपणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हातील आदिवासी, ग्रामीण भागात अशी अनेक मतदान केंद्रे आहेत की जेथे मोबाईल रेंज नसल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचा संपर्क निर्माण होत नाही. अशा केंद्रांवरील मतदानाची अधिक काळजी जिल्हा प्रशासनाला आहे.इगतपुरी, त्र्यंबेकश्वरसह सुरगाणा, दिंडोरी, कळवण , बागलाण आणि चांदवड या मतदारसंघांमध्ये अशी अनेक मतदारसंघ आहेत की जी संपर्काच्या कक्षेत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे तर त्यात अधिकच अडचण निर्माण झाल्याने या सर्व केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याठी लाईव्ह वेबकास्टींग केले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबतची कार्यवाही सुरू होती. येथील यंत्रणा मतदान अधिकाऱ्यांच्या कक्षेत जोडण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांची नजर संबंधित केंद्रावर राहाणार आहे. ही अतिशय प्रभावी यंत्रणा असून केंद्रातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याचा उत्तम मार्ग असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.रेंज नसलेल्या केंद्रांना मतदान अधिकाºयांच्या कक्षेशी जोडण्यासाठी शनिवारी तयारी पुर्ण करण्यात आली. वीज तसेच इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. सदर मतदान केंद्रापासून रेंज असलेल्या ठिकाणी अधिकारी या केंद्रांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक मतदान कक्षातील मतदारांच्या हालचालींवर लक्ष या माध्यमातून ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यातील ४५६ मतदान केंद्रांचे ‘लाईव्ह वेबकास्टींग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 8:23 PM