नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८मार्च) )दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३११ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये मतदानाची तयारी करण्यात आली आहे़ या निवडणुकीसाठी १६३ वकील उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नऊ वकिलांचा समावेश आहे़
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अॅड. इंद्रायणी पटणी, अॅड़ बाळासाहेब आडके, अॅड़ विवेकानंद जगदाळे, अॅड़ एस़यू़ सय्यद, अॅड़ लीलाधर जाधव, अॅड़ शालिग्राम हे नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलसाठी २०१० मध्ये निवडणूक झाली होती़ मात्र, सदस्यपदी निवडून आलेले सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव निवडणूक पुढे-पुढे ढकलली गेली़ अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल आठ वर्षांनी ही निवडणूक घेतली जात आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील १ लाख १२ हजार वकील मतदार यासाठी मतदान करणार असून, त्यापैकी ४ हजार ५०० वकील मतदान हे नाशिक जिल्ह्यातील आहेत़ प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी ५ तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार आहे़
या निवडणुकीद्वारे कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून त्यातूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिका-यांची निवड केली जाते़ दोन राज्यातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणा-या कौन्सिलच्या सदस्यपदी निवडून येण्यासाठी अनेक मातब्बरांनी साधारणत: वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे़चाळीस टक्के मतदार राहणार वंचितसुमारे पावणे दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत वकील महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये आहे़ मात्र, वकिलांच्या सनद पडताळणीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया केवळ एक लाख १२ हजार वकिलांनीच पूर्ण केली़ त्यामुळे सुमारे ६०-६५ हजार वकील या मतदानापासून वंचित राहणार आहेत़