नाशिक : मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही़ दरम्यान, हा वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने दोन विद्युत पोल संपूर्णत: वाकले तर त्यांच्या ताराही तुटल्याने या ठिकाणची वाहतूक अशोकस्तंभाकडून गंगापूररोडकडे वळविण्यात आली होती़
अशोकस्तंभ ते मेहेर रस्त्यावरील मित्रविहारजवळील महाकाय निबांचा वृक्ष सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ यामुळे रस्तादुभाजकावर असलेले विजेचे दोन खांब खाली कोसळले तर विद्युतताराही तुटल्या़ महाकय वृक्ष पडल्याने दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती़ या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली़ या घटनेची माहिती अग्निमशम विभागास दिल्यानंतर अवघ्या काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले व कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील वृक्षाच्या फांद्या हटविण्याचे काम सुरु केले़
वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांनी अशोकस्तंभापासन वाहने गंगापूर रोडकडे वळविण्यात आली होती़ सीबीएस सिग्नलवरील वाहने शालीमारकडे तर मेहेर सिग्नलपासून महात्मा गांधी रोडकडे वळविण्यात आले़ तर निमाणीकडे जाणाºया बस रेडक्रॉस सिग्नलपासून रविवार कारंजाकडे सोडण्यात आल्याने वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली़ सुमारे दोन तास रस्त्यावरील हा महाकाय वृक्ष बाजूला करण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, वीज महामंडळाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान, सकाळच्या वेळी या ठिकाणाहून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी ये-जा असते त्यावेळी हा वृक्ष कोसळला असता तर मोठी जिवीतहानी झाली असती़