नाशिक : मेहेर सिग्नलपासून ते महात्मा गांधी रोड व सांगली बँक सिग्नलपर्यंतच्या दुतर्फा असलेला सम-विषम वाहनतळाचा निर्णय पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महिनाभरासाठी प्रायोगिक तत्वावर रद्द केला आहे़ त्यामुळे लवकरच या मार्गावर दुतर्फा पिवळे पट्टे मारण्यात येणार असून त्याच्या आत दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आपली वाहने लावता येणार आहे़
महात्मा गांधी रोडवरील व्यापारी संकुले तसेच बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नेहेमीच नागरिकांची गर्दी वा वाहतुकीची कोंडी होते़ त्यातच या ठिकाणी वाहनतळाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांकडे रस्त्यावर वाहने उभी करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो़ नागरिकांचा सोय व्हावी यासाठी पी-१ व पी-२ ही पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली़ यानुसार सम तारखेस रोडच्या उत्तरेस चारचाकी तर विषम तारखेस दुचाकी वाहने पार्क करण्याचा आदेश वाहतूक शाखेने काढला होता़
महात्मा गांधी रोडवरील काही व्यवसायिकांनी त्यांच्याकडी वाहने ही दुकानासमोरच लावण्याचा हट्ट धरल्याने येणाऱ्या वाहनचालकांमध्ये सम-विषमच्या पार्किंगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होता़ त्यातच टोर्इंगची कारवाई केली जात असल्याने वाहनधारक व पोलीसांमध्ये वादविवाद होत होते़ यावर उपाय म्हणून उपायुक्त पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर एक महिन्यासाठी सम- विषम पार्किंग बंद करून रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने वगळता दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग करण्यास परवानगी दिली आहे़
यासाठी रस्त्यावर दुतर्फा पिवळे पट्टे मारण्यात आले असून या पट्टयाच्या आत वाहनचालकांना आपली वाहने उभी करावी लागणार आहे़ या नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़