नाशिक : अल्पवयीन मुलास आईसोबत विसंगत वागण्यास सांगून त्याचा भविष्यातील फायदा व आर्थिक स्वरूपातील उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीसह तिच्या आई-वडिलांनी अनैतिक कृत्यासाठी मुंबईला बोलावून घेतल्यानंतर चिथावणी देऊन मुंबईतील घरात ठेवून घेत अपहरण केल्याची फिर्याद नाशिकरोड परिसरातील एका महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, या मुलाची उपनगर पोलिसांनी सुटका केली आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेला १६ वर्षे आठ महिने वयाचा मुलगा आहे़ या मुलाची अल्पवयीन मैत्रीण व तिच्या आई-वडिलांनी मुलाचा अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत आईसोबत विसंगत वागण्यास भाग पाडले़ तसेच कुटुंबासोबत भांडण करण्यास सांगून आईच्या जिवास धोका निर्माण केला़ यानंतर या मुलीने व तिच्या आई-वडिलांनी स्वत:चा भविष्यातील फायदा व आर्थिक स्वरूपातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या मुलाला अनैतिक कृत्यासाठी मुंबईला बोलावून घेतले़ तसेच या अल्पवयीन मुलाला आईविरोधात चिथावणी देऊन आपल्या मुंबईतील घरात ठेवून घेत अपहरण केल्याचे मुलाच्या आईने फिर्यादित म्हटले आहे़
या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिचे आई-वडील अशा तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे़ दरम्यान, उपनगर पोलिसांनी या मुलाची मुंबईला जाऊन संशयितांच्या ताब्यातून सुटका केली आहे़