नाशिक : अवघ्या साडेआठ वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीस घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शिवनाथ मोतीराम बोरसे (रा़ यशवंतनगर ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी शनिवारी (दि़७) जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २३ आॅक्टोबर २०१५ रोजी ऐन दस-याच्या दिवशी ही घटना घडली होती़ या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या अवघ्या साडेआठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस आरोपी शिवनाथ बोरसे हा यशवंतनगरमधील स्वत:च्या घरात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला़ ऐन दस-याच्या दिवशी ही घटना घडली होती़ न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील विनयराज तळेकर व सुप्रिया गोरे यांनी दहा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयासमोर आलेले साक्षीदार व पुराव्यानुसार आरोपी बोरसे यास दोषी ठरविण्यात आले़
न्यायाधीशांनी आरोपी शिवनाथ बोरसे यास जन्मठेप तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची ही रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले़