नाशिक : वडिलांना मद्याचे व्यसन, फुलविक्रीतून घराचा गाडा हाकणारी आई, घरात दोन लहान भावंडे अशा हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अखेर गरिबीपुढे हात टेकवून आत्महत्या केल्याची घटना नाशिकरोडच्या भालेराव मळ्यात घडली आहे़ वैष्णवी विनोद शहरकर (रा. भालेराव मळा, जय भवानीरोड, नाशिकरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पी़ बी़ गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी नुकतीची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती़ तिला अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा होता़ मात्र, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती़ वडिलांचे मद्याचे व्यसन तर आई फुलविक्री करून कसेबसे घर चालवायची़ याशिवाय पाठीमागे लहान बहीण व भाऊ आहेत़ आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयात प्रवेश कसा घेणार तसेच गरिबीच्या परिस्थितीला कंटाळलेल्या वैष्णवीने रविवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असताना दहावी उत्तीर्ण करणा-या वैष्णवीने आत्महत्या करून जीवनाची अखेर केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़