सकारात्मक चर्चा : सीटू संघटनेने केला दावानाशिक : समान काम आणि समान दाम या मागणीसाठी गेल्या शंभर दिवसांपासून उपोषणास बसलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आणि विद्यापीठातील अधिकाऱ्याची वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे.समान काम, समान दाम तसेच निलंबित कर्मचाऱ्या ना कामावर घेणे या मागणीबरोबरच तत्सम भत्ते देण्याच्या मागणीसाठी आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी शंभर दिवसांपासून आरोग्य विद्यापीठासमोर उपोषणास बसले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे या कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी गुरुवारी (दि.१५) मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहू शकले नाहीत मात्र आरोग्य शिक्षण विभागाचे सहायक रामेश्वर नाईक यांनी उभयतांशी चर्चा केली. आंदोलकांच्या वतीने श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे यांनी चर्चा केली. तर आरोग्य विद्यापीठातर्फे कुलस्चिव डॉ. कालिदास चव्हाण, विधी विभागाचे अॅड. संदीप कुलकर्णी यांनी नाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी विद्यापीठाने समान काम समान दाम या मागणीला शासकीय आदेशाचा आधार असल्यास सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या मागणीबरोबरच ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्यांनादेखील कामावर घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, या संदर्भात विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी कुलसचिव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी ‘नंतर बोलण्याचा’ संदेश पाठविला. त्यामुळे या प्रकरणी विद्यापीठाची मुख्य भूमिका समजू शकली नाही.कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने यावेळी विशाल मोरे, संदीप दरेकर, विशाल चंद्रमोरे, कुणाल गोवर्धने, मनोज राजदर, प्राजक्ता वनीस, माधुरी चौधरी, तृप्ती जाधव, भारती देवकर, ज्योती पेखळे, अश्विनी पाठक, मनीषा मुरकुटे यांनीदेखील चर्चेत सहभाग घेतला.
आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:32 PM
समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे.
ठळक मुद्दे वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक यांच्याशी चर्चा सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला