नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील संशयितांनी दिराकडे पारायणासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे सोन्याचे दागिने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली़ विशेष म्हणजे या दुचाकीवरील संशयितांनी हेल्मेट घातलेले असल्याने पोलीस आयुक्तांची हेल्मेटसक्ती ही चेनस्नॅचरच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदुरा विलास पटवर्धन (६२, रा़ फ्लॅट नंबर ४, लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, मखमलाबाद) यांचे दीर कमलाकर पटवर्धन हे इंदिरानगरमधील भागीरथी अपार्टमेंट राहतात़ गुरुवारी त्यांच्याकडे पारायण असल्याने त्या सकाळी दिरांकडे आल्या होत्या़ पारायणासाठी येणाºया काही नातेवाइकांना पत्ता माहिती नसल्याने त्यांना घेण्यासाठी त्या असल्याने व त्यांना पत्ता माहिती नसल्याने घराजवळील आत्मविश्वास व्यायामशाळेजवळ थांबलेल्या होत्या़
पटवर्धन या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास व्यायामशाळेजवळ उभ्या असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन हेल्मेटधारी इसम त्यांच्याजवळ थांबले़ त्यापैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने संजय अपार्टमेंट कुठे आहे, असे विचारले असता त्यांना मला माहिती नाही असे सांगितले़ यानंतर या संशयितांनी पुढे जाण्याचे नाटक करून पुन्हा पाठीमागे वळून पटवर्धन यांच्या गळ्यातील ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खेचून नेले़ या प्रकरणी पटवर्धन यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़