नाशिक : लंडनला शिफ्ट होत असल्याने तत्काळ इनोव्हा कार विक्रीची ‘ओएलएक्स’वर जाहिरात देणाऱ्या संशयिताने सिडकोतील एका इसमास वाहन विक्री केल्याचे सांगत बँक खात्यात तीन लाख ८६ हजार रुपये भरण्यास सांगून आर्थिक फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोच्या उत्तमनगरमधील रहिवासी शैलेश येलमामे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ व १६ मे रोजी त्यांनी ओएलएक्स या वेबसाइटवर इनोव्हा कार विक्रीची जाहिरात बघितली़ लंडनला शिफ्ट होत असल्याने कारची तत्काळ विक्री करावयाची असल्याचे या जाहीरातीत नमूद करण्यात आले होते़ तसेच कार खरेदी करणाºयांच्या संपर्कासाठी ८४९६०९३०८४ व ९१०८९७९९४५ हे मोबाईल क्रमांक देण्यात आले होते़ त्यानुसार येलमामे यांनी या क्रमांकावर संवाद साधून कार खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले़
संशयिताने येलमामे यांना हरियाणातील गुडगावच्या येस बँकेच्या शाखेत आणि किशोर एंटरप्रायजेस नावाचे खाते क्रमांक ०१०५६३३००००४४७० वर ३ लाख ८६ हजार ७०० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार येलमामे यांनी संशयितावर विश्वास ठेवत बुधवारी पवननगर येथील मर्चंट बँकेत रक्कम भरली; मात्र संशयिताने हे पैसे काढून घेत इनोव्हा कार विक्रीचा व्यवहार न करता येलमामे यांची फसवणूक केली.