नाशिक : रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्वर्वमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ महिनाभरातील खुनाची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे पंचवटीत पुन्हा गँगवार सुरू झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मयत नागरेचा भाऊ सचिन नागरे याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर हा घरासमोरील मैदानात उभा होता. यावेळी सचिन-सचिन असा जोरजोराने आवाज दिल्याने ते घराबाहेर गेले असता त्यांना घरासमोरील मोकळ्या मैदानावर तोंडाला रुमाल बांधलेले संशयित लहान भाऊ किशोरच्या मानेवर, पाठिवर व पायावर धारदार शस्त्राने वार करीत होते़ सचिन नागरे यांनी मैदानाकडे धाव घेतली असता संशयित दुचाकीवरून फरार झाले़ सचिन नागरे यांनी गंभीर जखमी झालेला लहान भाऊ किशोर यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़
या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, निरीक्षक दिनेश बर्डेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते़ नागरे याचा खून कोणी व का केला याबाबतची माहिती समोर आली नसून पंचवटी पोलीस व गुन्हे शाखेने संशयितांच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.