नाशिक : पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणा-या शहरातील परप्रांतियांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडून खंडणी वसूली करण्याचे काम काही गुंड करीत आहेत़ इंदिरानगर परिसरातील वडाळा पाथर्डी रोडवरील पाणीपुरी विक्रेत्यास दुचाकीवरील संशयितांनी मारहाण करून दरमहा ठरविक रकमेचा हप्ता न दिल्यास व्यवसाय करू न देण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वर नगर म्हाडा कॉलनीच्या मागील सभ्र रो हाऊसमध्ये केशव रामनाथ सिंग राहतात़ मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले सिंग हे वडाळा पाथर्डी रोडवरील जगन्नाथ चौकात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात़ शिवजयतीच्या दिवशी अर्थात सोमवारी (दि़१९) त्यांनी नेहेमीप्रमाणे सायंकाळी चार वाजता पाणीपुरी विक्रीचा गाडा लावलेला होता़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पॅशन प्रो दुचाकीवर (एमएच १५, ईसी ६८१५) दोन संशयित आले़ या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दोनशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली़
पाणीपुरी खाल्ल्यानंतर या दोघांनी मुळचा कुठला आहे अशी विचारणा केली़ त्यांना मध्यप्रदेशातील असल्याचे सांगितल्यानंतर तु एमपीका भाई है क्या असे म्हणून पुन्हा दरमहा दोनशे रुपयांची मागणी केली़ त्यांना केशव सिंग याने पैसे नसल्याचे सांगताच शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली़ या गाडयावरील एक ग्राहक व शेजारील भेळवाल्याने रामसिंगची सुटका केली़ यानंतर या दोघांनी महिन्याला हप्ता दे अन्यथा तुझा गाडा फोडून टाकू अशी धमकी देत दोघेही दुचाकीवरून पळून गेले़ विशेष म्हणजे हे दोघे यापुर्वीही येऊन फुकटात पाणीपुरी खाऊन गेले होते़
केशव सिंग याने या मारहाणीनंतर पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़