नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले असून, याची सुरुवात पोलीस मुख्यालयातील पोलीस बॉईज मित्रमंडळापासून केली़ अनंत चतुर्थशीच्या पूर्वसंध्येला या मित्रमंडळाने नारळाच्या शेंडीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशाचे पारंपरिक ‘शिवराय’ ढोल पथकाच्या वाद्यांच्या गजरात व पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत विधिवत विसर्जन करण्यात आले़पोलीस मुख्यालयात यंदा सर्व मित्रमंडळांनी मिळून एकच गणरायाची प्रतिष्ठापना केली होती़ विशेष म्हणजे यावेळी नारळाच्या शेंडीपासून पर्यावरणपूरक अशा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती़ सोमवारी (दि़४) सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते आरती करण्यात आली़ यापूर्वी विसर्जन मिरवणुकीसाठी डीजेचा वापर केला जात असे, मात्र यंदा प्रथमच शिवराय ढोल पथकाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली़
शिवराय ढोल पथकातील पारंपरिक पोषाखातील युवक- युवतींचा सहभाग व ढोलच्या गजरात निघालेली ही मिरवणूक अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डवरून रामकुंडावर नेण्यात आली़ या ठिकाणी गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले़ यावेळी उपआयुक्त माधुरी कांगणे, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.