नाशिक : कारचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसविणाºया दिल्लीतील दोन टोळ्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे़ कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाºया या टोळीतील कंपनीचा मालक संशयित शत्रुघ्नकुमार बिंदेश्वर राय (२३), कॉल सेंटरमध्ये काम करणारे प्रकाश सिद्धार्थ सोनटक्के (२१), आकाश श्यामकुमार गुप्ता (२०) आणि मोबीन महंमद अस्लम (२०, सर्व रा. नवी दिल्ली) यांना सायबर शाखेने दिल्लीहून अटक केली़
१६ मे २०१८ रोजी बक्षिसामध्ये कार लागल्याचे सांगत संशयितांनी शहरातील स्मिता पाटील या महिलेची एक लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी पाटील यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ मात्र पाटील यांनी ही रक्कम पेटीएम आणि बँकेतील खात्याद्वारे संशयितांच्या बँकेत वर्ग केली होती़ सायबर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता हे पैसे वर्ल्डशॉपी, शॉपीबाय सिलेक्टक़ॉम आणि प्ल्युटीकार्ड या कंपन्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले़ याबाबत सखोल चौकशीत या सर्व कंपन्या दिल्ली येथील तसेच एकाच मालकाच्या असल्याचे समोर आले आहे.
सायबर पोलिसांचे एक पथक दिल्लीतील ओखला इंडस्ट्रीयल परिसरातील एफ ९५, ग्राउंड प्लोअर येथे पोहचले. या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्लुटोकार्ड नावाच्या कॉलसेंटरवर छापा मारून राय, सोनटक्के, गुप्ता व अस्लम या चौघा संशयितांना अटक केली. या चौघांकडून कॉलसाठी वापरले जाणारे १६ मोबाइल, ११ हार्डडिस्क आणि कॉलसेंटरमधील साहित्य असा १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या संशयितांना न्यायालयात हजर केले असता १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ त्यांच्याकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
फसवणुकीच्या गुन्ह्याची उकलकारचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून नीलेश बाबाजी मंडलिक यांची चार लाख ७४ हजार ३१५ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतील वसंत विहार परिसरातून सुनीता गोवर्धन नेगी (२७, रा. आयआयटी कॅम्पस, नवी दिल्ली) आणि सय्यद रझा महंमदअली हुसेन झैदी (२४, रा. डी २१, ओखला विहार, जामीयानगर) या दोघांना अटक केली आहे़