नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून शालकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयातील उंबरगाव येथे गत आठवडयात घडली होती़ या खूनानंतर फरार असलेल्या मेहुण्यासह त्याच्या मित्राला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने फुलेनगर तसेच नाशिकरोड रेल्वेस्थानकाहून अटक केली़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयातील रहिवासी संशयित भगवान किसन पवार याचा शालक बाळू जाधव हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असे़ या कारणावरून रविवारी (दि. १७ जून) रोजी संशयित भगवान किसन पवार व त्याचा मित्र भागवत सुखलाल पवार (२३) हे दोघे बाळू जाधव यास उंबरगाव येथील जंगलात घेऊन गेले़ यानंतर जाधव यास लाकडी दांडक्याने मारहाण करून तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व मृतदेह खड्डयात पुरून पसार झाले़
या खूनातील एक संशयित फुलेनगरला राहत असल्याची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले यांना मिळाली़ त्यानुसार या परिसरात सापळा रचून संशयित भगवान पवार यास पोलीसांनी ताब्यात घेतले़ त्याची कसुन चौकशी केली असता त्याचा मित्र भागवत पवार व हा गुजरात वरून रेल्वेने नाशिकला येत असल्याची माहीती मिळाली़ त्यानुसार पोलीसांनी रात्री रेल्वे स्थानकावर सापळा रचून भागवत पवार यास अटक केली.
पोलिसांनी या दोघांची कसुन चौकशी केली असता मयत बाळू जाधव व भागवत पवार हे शालक - मेहुणे असुन मयत जाधव हा मेहुणे पवार यांच्यावर सातत्याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असायचा. या कारणावरून दोघांत वादही झाले होते. चारित्र्याचा संशय घेत असल्याने शालकाचा काटा काढायचा या हेतूने गत रविवारी दुपारच्या सुमारास जाधव यास उंबरगावच्या जंगलात नेऊन त्यााचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
दरम्यान, या संशयितांना अटक करून तपासकामी गुजरात पोलीसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, हवलदार सचिन म्हस्दे, मोतीराम चव्हाण, दशरथ निंबाळकर, सतिश वसावे, भूषण रायते, सुरेश नरवडे, संतोष काकड, संदीप शेळके, महेश साळूंके, विलास चारोस्कर आदिंनी ही कामगिरी केली.