नाशिक : सीबीएस परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक करून युवकावर प्राणघातक हल्ला करून बंदुकीचा धाक दाखविणाºया अशोकस्तंभावरील टोळक्याची सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (दि़२१) धिंड काढली़ या संशयितांची दशहत कमी करण्यासाठी त्यांना परिसरात फिरवत नागरिकांकडे तक्रारीबाबत चौकशी केली़ पोेलिसांनी सुरू केलेल्या या उपक्र्रमामुळे गुन्हेगारांची दहशत कमी होण्यास मदत होणार असून या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे़
अशोकस्तंभ परिसरातील लोणार गल्लीत गुरुवारी (दि़१७) रात्री संशयित अभिमान सानप (रा.घनकर गल्ली) अविरत सानप (रा.रामवाडी),अक्षय सानप (रा.घारपुरेघाट),प्रितम आहिरे (रा.सिडको),प्रसाद बोराडे, प्रशांत जाधव (दोघे रा.आरटीओ कॉर्नर) व कृष्णा सानप (रा.मल्हार गेट चौकी) यांनी हातात कोयते,लाकडी दांडके घेऊन आशिष सिरसाठ या युवकाच्या घरावर दगडफेक केली़ यानंतर या टोळक्याने सिरसाठचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून बंदूक दाखवीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या़
सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी या संशयितांची अशोकस्तंभ, रविवार कारंजा तसेच ते राहत असलेल्या ठिकाणची दहशत कमी करण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातून धिंड काढली़ या संशयितांची प्रचंड पोलीस बंदोबस्तात अशोकस्तंभ,लोणार गल्ली, घणकर गल्ली,मल्हार गेट चौकी,गंगावाडी,घारपुरे घाट,रामवाडीसह संशयीतांची वास्तव्य असलेल्या मखमलाबाद,पेठरोड,सिडको आदी भागात धिंड काढण्यात आली. तसेच नागरिकांना संशयितांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले़