नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेट साठा करून विक्री करणाऱ्या भद्रकालीतील नॅशनल सुपारी दुकानावर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी (दि़१५) छापा टाकला़ या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सिगारेट असा सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून भद्रकाली पोलीस ठाण्यात दुकानमालकाविरोधात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
फुले मार्केटमधील नॅशनल सुपारी दुकानात गुटखा व परदेशी सिगारेटची विक्री सुरू असल्याची माहिती नखाते यांना मिळाली होती़ त्यानुसार वरीष्ठांना माहिती देऊन या दुकानावर तसेच खडकाळी सिग्नलजवळील गुदामावर छापा टाकून तपासणी केली़ यावेळी संशयित शेख सलीम शब्बीर हा गुटखा व सिगारेटचा साठा तसेच विक्री करताना आढळला़ नखाते यांनी भद्रकाली पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी, किशोर बावीस्कर यांना बोलावून घेत या मालाचा पंचनामा करून जप्त केला़
पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये विमल, हिरा, रॉयल, वाह, राजनिवास, आरएमडी, सिमला, मिराज या विविध कंपन्याचा ३ लाख १४ हजार १९० रुपये किमतीचा गुटखा पानमसाला व गुडगरम, ब्लॅक, रुईली रिव्हर या कंपनीचे पाकिटावर इशारा नसलेले १८ चे सिगारेट आढळून आले़ पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून दुकानमालकावर भद्रकाली पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़ गुन्हे शाखेचे संदीप पवार, अनिल भालेराव, बोडखे, वाल्मिक पाटील तर भद्रकाली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केदार व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते़