नाशिक : आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद पाटील (२५,राग़ुरू गंगेश्वर सोसायटी, वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़ विशेष म्हणजे तिघांपैकी दोघांना विहिरीबाहेर काढणारे पोलीस व वाचलेले दोघे यांच्यापैकी कुणीच बेपत्ता पवनचा शोध न घेतल्याने संशय निर्माण झाला असून, पोलिसांच्या पाठलागामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला जातो आहे़़
आडगाव शिवारातील हॉटेलमध्ये बुधवारी (दि़१३) मध्यरात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर काही जण माघारी गेले, तर पवन प्रतीक पाटील, जितेंद्र रामकुमार शर्मा (२२, राधिका सोसायटी, तपोवन) व सुनील साहेबराव जमदाडे (रा़आकृती अपार्टमेंट, अंबड लिंक रोड, नाशिक) हे तिघे ट्रक टर्मिनसजवळ उभे होते़ पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाजीर शेख, मिथून गायकवाड व वैभव परदेशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हे तिघे संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले़पोलिसांनी या तिघांचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी महामार्ग ओलांडत आडगाव ट्रक टर्मिनसमोरील जय महाराष्ट्र भोजनालयाकडे पळाले असता ते पाठीमागील विहिरीत पडले़ यापैकी जितेंद्र शर्मा व सुनील जमदाडे यांना पोलिसांनी बाहेर काढले, मात्र तिसºयाचा शोध लागला नाही़ सकाळी साडेपाच वाजता अग्निशमन दलास माहिती दिल्यानंतर त्यांनीही गळ टाकून बघितला, मात्र मृतदेह सापडला नाही़ तर शनिवारी (दि़१६) सकाळी पवन पाटील याचा मृतदेह पाण्याबाहेर तरंगताना आढळून आला़ दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दरम्यान, गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाण्याबाहेर काढलेल्या दोघांना पळून जाण्याबाबतचा जाबजबाब घेतला नसल्याचेही कळते़ यामुळे पोलिसांनी तसेच वाचलेल्या दोघांनी पवन पाटील याची दोन दिवस साधी चौकशीही न केल्याने संशय निर्माण झाला आहे़ याबरोबरच साडेतीन वाजेची घटना असताना पोलिसांनी ५़३० वाजता अग्निशमन दलास का माहिती दिली? पोलीस पाठलाग करीत होते तर हे तिघे ट्रक टर्मिनसकडे असताना महामार्ग ओलांडून इकडे कसे पळाले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़महामार्गावर देहविक्रय जोमात़़़आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास देहविक्री व्यवसाय जोमात सुरू आहे़ या व्यवसायास पोलिसांकडूनच खतपाणी दिले जात असून काही देहविक्रय करणाºया महिलांचे आडगाव पोलिसांशी चांगले संबंध आहेत़ पोलीस व देहविक्रय करणाºया महिला एकत्रितपणे अर्थपूर्ण काम करीत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे़ दरम्यान, वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या या युवकांची माहिती पोलिसांना या देहविक्रय करणाºया महिलांनीच दिल्याची चर्चा आहे़सीडीआर रिपोर्ट मागवा़़़पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ अधिकाºयाच्या मर्जीतील एकाने आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात स्वत:ची वर्णी लावून घेतली़ यानंतर महामार्गावर देहविक्रय करणाºया महिलांसोबत संधान साधत या वाटेला जाणाºयांची आर्थिक लूट सुरू केल्याचे चर्चा खुद्द आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात आहे़ गुन्हे शोध पथकातील संबंधिताचे सीडीआर रिपोर्ट मागविल्यास सत्य समोर येईल असे नाव न छापण्याच्या अटीवर आडगाव पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाºयांनी सांगितले़