लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे नियोजित असले तरी या कामातील तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब लक्षात घेता कुलगुरू नितीन करमळकर यांनी सध्याचे उपकेंद्र प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी त्यांनी शहरातच तीन ठिकाणी जागांची पाहणी केली आहे. नवीन वर्षात नाशिक उपकेंद्र नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने व्यापक पावले उचलली जात आहेत.पुणे विद्यापीठाचे नाशिकला उपकेेंद्र असून, २००६ पासून शरणपूररोडवरील महापालिकेच्या मार्केटमध्ये वरच्या मजल्यावर उपकेंद्राचे कार्यालय सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसचा विस्तार आणि तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेता विद्यापीठाने नगर आणि नाशिकमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम करण्याचा निर्णय घेऊन बृहत आराखड्यात दोन्ही केंद्रांसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूदही केली.नाशिक उपकेंद्रासाठी दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथे सुमारे ६२ एकर शासनाची जागा विद्यापीठाला मिळाली असून, त्यातील काही गटांवर विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे नावही लागलेले आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी आणि अतिक्रमणामुळे जागा पुर्णत: मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने हा तिढा सुटण्यास किती दिवस लागू शकतील याचा कोणताही अंदाज नाही. त्यामुळे कुलगुरू करमळकर नाशिकचे सध्याचे उपकेंद्र नाशिक शहरातच प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिकरोड येथील पासपोर्टशेजारील जागा आणि त्र्यंबकरोडवर दोन ठिकाणी जागांची पाहणीदेखील करण्यात आलेली आहे. यापैकी एक जागा निश्चित होण्याची शक्यता असून, शक्यतो नाशिकरोड येथील जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या ज्या ठिकाणी पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र आहे. त्या ठिकाणची जागा अत्यंत कमी असून, सुरक्षितता आणि कामकाजाच्या दृष्टीने अनेक अडचणी असल्याचे निरीक्षण कुलगुरूंनी नोंदवून तत्काळ जागा शोधण्याच्या कामाला गती दिली आहे. येत्या महिनाभरात जागा निश्चित करण्यात येऊन सर्व सोपस्कर झाल्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन जागेत सध्याचे कार्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.