नाशिक : येत्या चोवीस तासांत नाशिकसह उत्तर मध्य महाराष्टÑातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सर कायम असल्याने पावसाच्या टक्केवारीतदेखील वाढ झालेली आहे. मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा आणि सिन्नर तालुक्यांमध्ये पिकांसाठी उपयुक्त पाऊस झाल्याने शेतकरी मात्र आनंदित आहे.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ झालेली आहे तर नदी, नाल्यांनादेखील पाणी वाहू लागले आहे. पावसाने पाठफिरविल्याने काहीशी चिंता नाशिककरांना लागली असतानाच संततधार पावसामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झालेली आहे. सध्या धरणात ८५ टक्के पाणीसाठा असून, धरणातून ३१६८ पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसते.शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ३७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस हा त्र्यंबकेश्वरमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीतही पावसाचा जोर चांगला असून, आजवर तेथे ८५ टक्के पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. शुक्रवारी एका दिवसांत १५७ मि.मी. पावसाची पाऊस कोसळला. पेठमध्येदेखील पावसाची कृपादृष्टी बरसली आहे. पेठमध्ये १०७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.
चोवीस तसात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:58 PM