नाशिक : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्यांची झालेली अवस्था आणि महसूल कर्मचारी म्हणून मदत तसेच पंचनामे यासारखी कामे यंत्रणेला करावी लागत असल्यामुळे जनसेवा प्रथम कर्तव्य असल्यामुळे शुक्रवार, दि. १६ रोजी होणारे नियोजित लेखनीबंद आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप यांनी दिली.आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून सध्या आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून, विभागीय कार्यालयासमोरील धरणे तसेच गांधीगिरी पद्धतीने एक तास जादा काम करून संघटनेकडून आंदोलनाचा एकेक टप्पा पूर्ण केला जात आहे. नियोजित कार्यक्रमानुसार दि. १६ रोजी लेखनीबंद, तर दि. २१ रोजी सामुदायिक रजा व धरणे आंदोलन असे कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. तथापि राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन स्थगित केले आहे.राज्यातील पुणे, नाशिक व कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. बाधितांना मदत पोहोचविणे व नुकसानीचे पंचनामे करणे हे पुनर्वसनाचे काम महसूल कर्मचारी रात्रं-दिवस करीत आहेत. जनतेच्या सेवेसाठी महसूल कर्मचारी सदैव तत्पर असतात तेव्हा पूर व अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीत जनतेची सेवा प्रथम कर्तव्य असल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दि. १६ चे लेखणीबंद आंदोलन व दि. २१ रोजी सामुदीय रजा ही आंदोलने पुढे ढकलण्यात आली असून, अनुक्र मे दि. २८ व ३१ रोजी सदर आंदोलने करण्यात येणार आहेत.
महसूल कर्मचाऱ्यांचे लेखनीबंद आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 6:47 PM