नाशिक : एकंदरीतच रिक्षाचालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही़ मात्र, या व्यवसायातील काही रिक्षाचालकांमधील आपल्या व्यवसायाप्रतीची निष्ठा व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सोमवारी(दि़१८) दुपारी घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झाले़ मुंबईतील जोगेश्वरी येथील एका दाम्पत्याची विसरलेली बॅग व त्यामधील दोन लाख रुपये किमतीचे दागिने रिक्षाचालक संजय पांडुरंग धोंगडे (रा़हिरावाडी, पंचवटी) यांनी प्रामाणिकपणे परत केली़ त्यांच्या या प्रामाणिकपणाबाबत या दाम्पत्याने आभार तर मानलेच याशिवाय पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रिक्षाचालक धोंगडे यांचा सत्कार केला आहे़
मुंबईतील जोगेश्वरी येथील संदीप आमरे व त्यांची पत्नी ज्योती आमरे हे सोमवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील इंदू लॉन्स येथून रिक्षात (एमएच १५, झेड- ७२९९) बसले व पंचवटीतील निमाणी बसस्टॅण्डवर उतरले़ रिक्षातून उतरल्यानंतर ज्योती आमरे यांच्या लक्षात आले की त्यांची दोन लाख रुपये किमतीची दागिने ठेवलेली बॅग रिक्षामध्येच राहिली़ यानंतर आमरे दाम्पत्या या घटनेची माहिती देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शेगर व कर्मचाऱ्यांना रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले़
पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत असतानाच रिक्षाचालक धोंगडे यांनी संदीप आमरे यांना फोन करून फोन करून बोलावले व पोलीस ठाण्यात घेऊन आले़ यानंतर धोंगडे यांनी रिक्षात विसरलेली बॅग आमरे दाम्पत्याकडे सोपविल्यानंतर बॅगची तपासणी केली असता त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेल्या ठिकाणीच असल्याचे आढळून आले़ रिक्षाचालक धोंगडे यांच्या प्रामाणिकपणामुळेच आमरे दाम्पत्यास त्यांचे दोन लाखांचे सोन्याचे दागिने परत मिळाले़ त्यांनी रिक्षचालक व पंचवटी पोलीसांचे आभार मानले़