नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून ४० डिग्री सेल्सिअस अंशांवर स्थिरावलेल्या तापमानामुळेनाशिककरांना गुरुवारीदेखील तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. बुधवारी ४१ अंशांवर असलेला पारा ४०.५ अंशांवर आला असला तरी राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा कडाका चांगलाच जाणवला. यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली होती.दोन दिवसांपासून नाशिक शहरातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या जवळपास असून, येत्या २४ तासात त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याशिवाय उष्णतेची लाट वाढण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आल्यमुळे नाशिककरांना पुढील काही दिवस तीव्र उन्हाळा सहन करावा लागणार आहे. राज्यात अजूनही उष्णतेची लाट कायम असताना ४० ते ४२ अंशांच्या पुढे नाशिक शहराचा पारा गेल्यामुळे कडक उन्हाळा नाशिककरांना असह्य झाला आहे. कमाल पारा वाढलेला असतानाच किमान पारा २२ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यातच मध्येच दाटून येणाऱ्या ढगांमुळे उकाड्यात आणखीनच वाढ होत आहे.
४० अंश तापमानाचे नाशिककरांना चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:18 AM