नाशिक - अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन २०१७ साठी घोषित केलेल्या पुरस्कारांमध्ये नाशिकच्या रंगकर्मींचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘संगीत देवबाभळी’ने सन्मान प्राप्त केला आहे.रंगभूमीवरील योगदानासाठी दिले जाणारे विविध पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ तथा प्रसाद कांबळी आणि प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी घोषित केले आहेत. त्यात नाशिकच्या रंगकर्मींवर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे. रंगभूमीसोबतच इतर क्षेत्रातील भरीव विधायक कामगिरीबद्दल कै. राजाराम शिंदे पुरस्कृत नाटयमंदार पुरस्कार डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे तर व्यावसायिक रंगभूमीवर सवोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक म्हणून प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार प्रफुल्ल दीक्षित, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार आनंद ओक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सिद्धार्थ बोडके तर प्रायोगिक रंगभूमीवरील ‘मून विदाऊट स्काय’या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रणव प्रभाकर यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकालाही सर्वोत्कृष्ट नाटकाचा सन्मान जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त रंगकर्मींचा गौरव येत्या १४ जून रोजी होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात करण्यात येणार आहे.‘हंडाभर चांदण्या’ला मान९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात नाशिकचेच नाटककार दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग देखील सादर होणार आहे. नाशिकच्या नाटकास सादरीकरणाचा हा मान मिळाल्याने नाशिककरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नाशिकच्या रंगकर्मींना नाट्यपरिषदेचे पुरस्कार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 3:45 PM
गौरव : ‘संगीत देवबाभळी’ सवोत्कृष्ट नाटक
ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा