नाशिक- भाजप सरकारच्या काळात नाशिकसाठी मंजुर करण्यात आलेली देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो सेवा ही आदर्श असून ती रद्द केल्यास नाशिककरांचे मोठे नुकसान होऊ शकते असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केले.
राज्यात सत्तांतर झालेल्यानंतर फडणवीस यांनी दत्तक नाशिकसाठी घेतलेल्या योजनांचा फेर आढावा घेणे सुरू झाले असून ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी मेट्रो सेवेविषयी शंका उपस्थित केली आहे. नागपुरात मेट्रो रिकाम्या धावतात त्यामुळे योजनेची व्यवहार्यता पडताळली पाहीजे असे भुजबळ यांनी आलिकडेच व्यक्त केल्याने नाशिकच्या मेट्रो सेवेचे भवितव्य अधांतरी आहे.
यासंदर्भात आज नाशिकमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आजवर मेट्रोचे प्रस्ताव आले परंतु ते व्यवहार्य नव्हते. त्यामुळे टायरबेस्ड मेट्रो हा नवा प्रयोग नाशिकमध्ये करण्यात येणार आहे. देशातील अशाप्रकारची ही पहिलीच सेवा असणार आहे. वेग, व्यवहार्यता आणि किफायतशीर या सदरात ही सेवा बसणारी आहे. त्यामुळ केंद्र सरकारने सहा ते सात शहरात टायर बेस्ड मेट्रो सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रो संदर्भात काही शंका असतील तर त्या समजून घ्याव्यात परंतु ही सेवा रद्द करू नये तसे झाल्यास हा निर्णय दुदैर्वी असेल असेही फडणवीस म्हणाले