संजय पाठक,नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, प्रतिष्ठा न बाळगता सारेच या बाजारात विकण्यास सज्ज असतात. नाशिकच्यामहापौरपदाचीनिवडणूक बिनविरोध झाली असल्याने हे सारे प्रकार बाहेर पडले नसले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक बिनविरोध होण्यामागे फिस्कटलेली आर्थिक गणिते हेच मोठे कारण ठरले आहेत.नाशिकच्या महापौरपदासाठी शुक्रवारी (दि.२२) झालेल्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदी भिकुबाई बागूल बिनविरोध निवडून आले. यशासारखे यश नाही, त्यामुळे त्यातील अनेक त्रुटींवर पांघरूण घातले गेले. मात्र प्रत्यक्षात भाजपसह साºयाच पक्षातील पितळ उघडे पडले.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आल्यानंतर पहिले वर्ष सुखात जाते, नंतर मात्र खटके उडू लागतात मग भांड्याला भांडे लागते आणि अखेरीस मात्र थेट पक्षाच्या कारवाईला देखील कोणी भीत नाही. हे चित्र दर पंचवार्षिक कारकिर्दीतील हे आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले असल्याने पहिल्यावेळी रंजना भानसी यांची निवड झाली. मात्र नंतर भाजपत यंदा सत्तापदावरून वाद सुरू झाले. महापालिकेतील काही नगरसेवक दरवर्षी सत्तापदे घेतात आणि सर्वच ठिकाणी ते इच्छूक असतात. त्यामुळे भाजपत अस्वस्थता होती. पक्षात मुळचे केवळ ११ नगरसेवक आहेत. बाकी बाहेरचे नगरसेवक असल्याने या पक्षांत केवळ बाहेरील पक्षांना न्याय दिले जात असल्याची भावना होती ती दूर करण्यात आली खरी मात्र त्यासाठी पक्षाला अनेक प्रकारच्या संघर्ष आणि अभिनिवेशाला सामोरे जावे लागले. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर काहींनी अन्य पक्षाच्या उमेदवारीसाठी देखील मतदानाची तयारी दर्शविली तर पक्षातील दहा ते बारा नगरसेवक अगोदरच फुटले असल्याचे स्पष्ट झाले होते. ते नंतर पक्षातच परत आले खरे परंतु ते येण्यामागे विरोधी पक्षातील गणिते न जुळल्याचे प्रमुख कारण होते.
विरोधी पक्षातील शिवसेना हा प्रमुख पक्ष होता. या पक्षाला बहुमत मिळवणे सोपे नव्हते. परंतु त्यांनी धारिष्ट केले खरे असले तरी कोणतेही नगरसेवक मते देण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही त्याचे कारण वेगळेच असते आणि ते कारण म्हणजे विरोधातील काही पक्षांची अपेक्षा पूर्ती करण्यात शिवसेनेला यश आले नाही. सहाजिकच उमेदवारीसाठी याच पक्षात होत असलेली रस्सीखेच थांबली. मात्र या पक्षात उमेदवारीसाठी असलेली रस्सीखेच इतकी शिगेला पोहोचली होती की अमुक उमेदवाराला संधी दिल्यास बाहेर पडू अशा धमक्या देखील देण्यात आल्या.
कॉँग्रेस मध्ये दोन गट होते त्यात केवळ डॉ. हेमलता पाटील एकाकी पडल्या. आधी शिवसेनेबरोबर राहण्यास कटीबध्दता दाखवणाºया कॉँग्रेसच्या काही नगरसेवकांनी घुमजाव केले. पक्षातील गटबाजी मिटवणे प्रदेश नेत्यांना देखील शक्य झाले नाही. मनसेत देखील पक्षाच्या पाच नगरसेवकांपैकी तीन मतप्रवाह होते अखेरीस राज ठाकरे यांनी भाजपाला पाठींबा दिल्याने हा विषय बाजूला पडला. मनसेने भाजपला पाठिंबा का दिला, या विषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत.