संजय शहाणे
नाशिक : इंदिरानगरजवळच्या राजीवनगर वसाहतीमध्ये राहणारे गांगुर्डे कुटुंब बुलढाण्याला आपल्या सर्व परिचित लोकांसोबत देवदर्शनाला गेले होते. शनिवारी (दि.१४) बुलढाणा येथील हजरत सैलानी बाबा यांच्या दर्ग्यात दर्शन घेऊन रात्री शिर्डीच्या दिशेने प्रवासाला निघाले असताना काळाने मध्यरात्री समृद्धी महामार्गावर घाला घातला. भाविकांची ट्रॅव्हल्स मिनी टेम्पो ट्रकवर पाठीमागून भरधाव जाऊन आदळला अन् होत्याचे नव्हते झाले. गोरगरीब गांगुर्डे कुटुंबीय या अपघातात मृत्यूमुखी पडून कायमचे देवाघरी गेले. ही घटना रविवारी (दि.15) सकाळी राजीवनगर भागात वाऱ्यासारखी पसरताच शोककळा व्यक्त होत होती.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराय येथे सैलानी बाबा यांचा प्रसिद्ध दर्गा आहे. हा दर्गा हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाशिक शहरातील तसेच जिल्ह्यातील रहिवासी असलेले ३५भाविक येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासोबतच राजीवनगर येथील रहिवासी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणारे सहा प्रवासी होते. या अपघातात मयत झालेल्या १२पैकी राजीवनगरमधील चौघांचा समावेश आहे.राजीवनगर वसाहतीत सुमारे २२ वर्षांपासून वास्तव्यास असलेले झुंबर काशिनाथ (५८) यांच्यासह त्यांची पत्नी सारिका झुंबर गांगुर्डे (४०), बारावीत शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा अमोल झुंबर गांगुर्डे (१८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. झुंबर गांगुर्डे हे येथील जवळच्या वडाळागावात मासेविक्री करत होते, तर सारिका गांगुर्डे यादेखील एका दुकानात रोजंदारीने काम करत त्यांना हातभार लावत होत्या. त्यांच्यासोबतच तेथील शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिण अंजना रमेश जगताप (३८) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. सारिका व अंजना या दोघीही एकाच दुकानात काम करत होत्या. अंजना यांच्या पश्चात मुलगा, सून असा परिवार आहे. अमोलदेखील शिक्षण सांभाळून केटरिंगच्या कामावर जात आई-वडिलांच्या कष्टाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत होता; मात्र नियतीला हे मान्यच नसावे, म्हणून की काय काळाने या तीघांना कायमचे हिरावून नेले.
समतानगरमध्येही शोककळा
आगरटाकळी गावातील समतानगर, राहुलनगर भागातील रहिवासी असलेले काजल लखन सोळसे (३२) त्यांची पाचवर्षीय बालिका तनुश्री लखन सोळसे या मायलेकींचा या अपघातात मृत्यू झाला. ही घटना परिसरात कळताच त्यांच्या राहत्या घरी नागरिकांनी रविवारी (दि.१५) सकाळी गर्दी केली होती. या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच रजनी गौतम तपासे (३२,रा.गौळाणे), यांचाही मृत्यू झाला आहे.