नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके यांच्यासमवेत आता ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. त्यामुळे माया व प्रियांकानंतर नाशिकची तिसरी खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
नुकत्याच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे ईश्वरी सावकारने फलंदाजीचे दमदार प्रदर्शन केले. सलामीवीर म्हणून खेळताना ईश्वरीने आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावरच ईश्वरीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. महिला क्रिकेटमधील या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वाला अजून एक अपेक्षित सुखद निर्णय झाल्याचे समाधान लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरीचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.