अझहर शेख नाशिकनाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालवता यावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर ‘कलाग्राम’ उभारणीचे काम हाती घेतले. बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन बंद पडले आहे. तीन ते चार महिन्यांपासून निधीअभावी काम ठप्प झाल्याने कुंभमेळ्यामध्ये पर्यटकांच्या सेवेत येणाऱ्या ‘कलाग्राम’ला पुन्हा ग्रहण लागले आहे. कुंभमेळा उलटून वर्षभराचा कालावधी उलटला, मात्र अद्याप कलाग्रामचा शुभारंभ होऊ शकला नाही.दोन वर्षांपूर्वी कलाग्राम उभारणीसाठी महामंडळाकडून भूसंपादन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविल्याने कलाग्रामचे भूमिपूजन वादग्रस्त ठरले होते; मात्र यावर तत्कालीन जिल्हाधिकारी, महामंडळाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने तोडगा काढला आणि कलाग्राम आकाराला येण्यास सुरुवात झाली. २०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश आहे. या बाजारपेठेत आदिवासी बांधवांनाही त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे.यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील कला विकसित होण्यास मदत होईल. याबरोबरच नाशिकच्या पर्यटनालाही वाव मिळेल, असा विश्वास पर्यटन महामंडळाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, सरकारकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ‘कलाग्राम’ सुरू होणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे कलाग्राम पर्यटकांसाठी कधी उपलब्ध होईल, याबाबत अनिश्चितता आहे.
नाशिकच्या ‘कलाग्राम’ला अंतिम टप्प्यात ‘ग्रहण’
By admin | Published: October 26, 2016 12:12 AM