नाशिक : औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अर्थात सीनिअर इन्व्हिटेशन लीगच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकच्या कुणाल कोठावदेने सीएमए संघाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना घणाघाती नाबाद द्विशतक झळकावले. कुणालच्या १९ चौकार व ९ षट्कारांसह, २१८ चेंडूतील नाबाद २०० धावांच्या जोरावर नाशिकने ८ बाद ३८७ अशी मोठी धावसंख्या उभारली. कुणाल कोठावदे व धनंजय ठाकूरने २ बाद ३६ वरून तिसऱ्या गड्यासाठी १८७ धावांची भागीदारी केली. उत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर सीएमए २ बाद १४ अशा स्थितीत आहे.
संक्षिप्त धावफलक:
नाशिक - नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव - ८ बाद ३८७ (७८.१ षटके) डाव घोषित - कुणाल कोठावदे नाबाद २००*, धनंजय ठाकूर ७९. गोलंदाजी रिषभ गुप्ता ३, तर प्रतीक पोखर्णीकर २ बळी.
सीएमए पहिला डाव - २ बाद १४ ( ९ षटके ) - तन्मय शिरोडे व ऋतुराज ठाकरे प्रत्येकी १ बळी.