नाशिक : गोव्यातील ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये खो-खो स्पर्धांचे आयोजन ४ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याची मैदानी निवड चाचणी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात नाशिकच्या निशा वैजल हिची राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.
या चाचणी स्पर्धेतून राज्याचे प्रातिनिधिक संघ जाहीर करण्यात आले आहेत. या संघात यंदा ‘संस्कृती’ नाशिकची खेळाडू निशा वैजल हिची निवड करण्यात आली आहे. या आधी १९९९ मध्ये मणिपूर येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये नाशिकच्या खेळाडूची निवड झाली होती. त्यानंतर तब्बल दोन तपांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्याच्या संघात निवड होणारी खो खो प्रबोधिनीची निशा वैजल ही पहिली खेळाडू आहे.
निशा वैजल हिची या वर्षातील दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असून जून महिन्यात दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजेत्या संघाची ती मुख्य खेळाडू होती. निशा ही पंचवटीतील श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिला गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.