नाशिक : येथील सिन्थेटिक ट्रॅकवर आयोजित निवड चाचणीमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी दावेदारी निश्चित केली. त्यात गुरुवारी (दि.१६) नाशिकच्या आदेश यादवने पाच हजार मीटर प्रकारात, तर यमुना लडकत हिने ८०० मीटर स्पर्धेत अव्वल स्थानासह बाजी मारली.
नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात सकाळी दहा हजार मीटर धावणे या पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामध्ये बुधवारी १० हजार मीटर स्पर्धेत नाशिकच्या दिनेशने, तर तीन हजार स्टीपल चेस स्पर्धेत कोमल जगदाळेने बाजी मारली. त्याशिवाय महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत यमुना लडकतने पाहिला, तर ताई बामणे हिने दुसरा क्रमांक मिळविला होता. गुरुवारी झालेल्या पाच हजार मीटर धावणे या प्रकारात नाशिकच्या आदेश यादवने १४ मिनिटे २० सेकंद अशी वेळ देत प्रथम, तर नाशिकच्याच किसन तडवीने दुसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या ८०० मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या यमुना लडकत हिने २.० मिनिटात ही धाव पूर्ण करून बाजी मारली. पतियाळा, पंजाब येथे दि. २ जुलैपासून ६०व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात टोकियो जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये नाशिकची सुवर्णकन्या ऑलिंपियन कविता राऊत-तुंगार हिने निवड समिती प्रमुख म्हणून आपली भूमिका पार पाडली आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेला नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल देशमुख, कार्यकारी सदस्य चंद्रशेखर सिंग यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल शिरभाते आणि त्याचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरुवारच्या निवड चाचणीचे निकाल -
पुरुष -
१) ५,००० मीटर धावणे - आदेश यादव ( नाशिक) , किसन तडवी (नाशिक), प्रशांत मिश्रा ( ठाणे)
२) लांब उडी - अनिलकुमार साहू, शुभम पाटेकर (मुंबई उपनगर), पुनाजी चौधरी (नाशिक)
३) २०० मीटर धावणे - राहुल कदम (मुंबई उपनगर), अक्षय खोत (ठाणे) , सचिन नान्हे (अमरावती )
४) उंच उडी - राजवंत गुप्ता (मुंबई उपनगर) - प्रथम
५) ४०० मीटर हर्डल्स - सिद्धेश चौधरी (पुणे), भूषण पाटील (कोल्हापूर )
६) भाला फेक - अनिल घुंगसे (औरंगाबाद), सागर मोहिते (कोल्हापूर )
७) ८०० मीटर धावणे - अजिंक्य मांजरे (पुणे) , संग्राम भोसले (पुणे) , प्रफुल लाटे (अहमदनगर)
महिला गटातील विजेते
१) ५,००० मीटर धावणे - निकिता राऊत (नागपूर), प्राजक्ता गोडबोले (नागपूर )
२) २०० मीटर धावणे - सिद्धी हिरे (पुणे), भविशा कोठारी (मुंबई शहर)
३) लांब उडी - अमृता पाटील (रायगड) , श्वेता ठाकूर (मुंबई उपनगर)
४) हातोडा फेक - स्नेहा जाधव (सातारा), सौरंभी वेदपाठक (पुणे)
५) उंच उडी - समीक्षा उपरीकर (अमरावती)
६) ४०० मीटर हर्डल्स - दामिनी पेडणेकर (ठाणे), अनुष्का कुंभारे (सातारा)
६) ८०० मीटर धावणे - यमुना लडकत (नाशिक)
७) भाला फेक - अनिल घुंगसे (औरंगाबाद) , सागर मोहिते (कोल्हापूर)
८) ८०० मीटर धावणे - अजिंक्य मांजरे (पुणे) , संग्राम भोसले (पुणे ), प्रफुल लाटे ( अहमदनगर)
फोटो
१७रनिंग