नाशिक : तीन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा प्रचंड उत्साहात रंगलेल्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी मात्र सध्या नाशिकला प्रशिक्षण घेत असलेल्या अक्षय कुमार याने २ तास २६ मिनिटे ०१ सेकंदाच्या वेळेसह विजेतेपद पटकावले. भारतीय लष्करातील देवळालीचे सैनिक सिकंदर तडाखे यांनी व्दितीय तर देवळालीच्याच सैन्यदलातील गुरजित सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ‘चक दे इंडिया’ चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले माजी भारतीय गोलकिपर हॉकीपटू आणि प्रशिक्षक मीर रंजन नेगी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
मविप्र मॅरेथॉन चौक ते हरसूलदरम्यान रंगलेल्या या मविप्र मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी पावणेसहापासून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर हॉकी प्रशिक्षक मीर रंजन नेगी, श्रीमती नेगी यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह मविप्रचे सर्व संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. ठाकरे यांनी मविप्र मॅरेथाॅन स्पर्धा दोन-तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याशिवाय स्पोर्ट्स अकॅडमीसह मविप्र एफएम रेडीओदेखील सुरु करणार असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. डॉ. ढिकले यांनी हॉकीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यात नेगी यांच्या जीवनावर आधारीत चक दे इंडिया चित्रपटाचे मोठे योगदान असल्याचेही सांगितले.