नाशिक- प्रत्येक प्रकल्प वादात सापडलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या सध्या शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या २६९ कोटी ५१ कोटींच्या कामांच्या ज्यादा दराच्या निविदा मंजुर करण्यात आल्याने तब्बल १२७ कोटी ८५ लाख रूपयांचा वाढीव भुर्दंड सोसावा लागणार आहे. सर्वच निविदा ज्यादा दराच्या असल्याने या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी येथील समाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केली आहे.
स्मार्ट सिटीच्या सर्वच कामांच्या निविदा वादग्रस्त ठरल्या आहेत. गेल्यावेळी तर गावठाण विकास कामांसाठी तब्बल साठ टक्के ज्यादा दराची निविदा मंजुर करण्याचे घाटत होते. त्यावर बरीच ओरड झाल्यानंतर मात्र ती निविदा रद्द करून कामांचे तुकडे करून निविदा मागविण्यात आल्या होत्या. स्काडा मीटर निविदा प्रकरण देखील गाजले होते. परंतु त्यानंतर गेल्याच वर्षी १८ जुलै रोजी कंपनी संचालकांच्या बैठकीत विविध प्रकल्पांच्या ज्यादा दराच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
प्रोजेक्ट गोदा या प्रकल्पाची मुळ किंमत ५४ कोटी रूपये होती. मात्र निविदा वाढीव दराची मंजुर करण्यात आली. त्यामुळे अंतिम किंमत ६८ कोटी रूपये झाली. म्हणजेच १४ कोटी रूपये वाढविण्यात आले. महात्मा फुले कालादन नूतनीकरणाच्या मुळ कामाची किंमत १ कोटी १२ लाख रूपये होती. परंतु काम ३ कोटी ७० लाख रूपयांत गेले. त्यामुळे २.५८ कोटी वाढीव भुर्दंड सहन करावा लागला. नेहरू उद्यानाचे नूतनीकरण करण्यासाठी ४५ लाख रूपयांचे प्राकलन होते.मात्र अंतिमत: हे काम १ कोटी ३२ लाख रूपयापर्यंत गेले. म्हणजेच ८७ लाख रूपये ज्यादा मोजावे लागले.
कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे नूतनीकरण तर भलतेच महागात पडले आहे. या कामाची मुळ खर्च ५ कोटी ६४ लाख रूपये दाखवण्यात आली होती. परंतु त्यात ४ काटी ३२ लाख रूपयांचा खर्च वाढला आणि ९ कोटी ९६ लाख रूपये खर्च आला. ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आणिकमांड कंट्रोल सेंटरच कामाचे प्राकलन ५६ कोटी ९४ लाख इतके होते. मात्र या कामासाठी ७८ कोटी ७९ लाख रूपये खर्च झाला असून तब्बल २१ कोटी ८५ रूपये खर्च झाला आहे. होळकर पुलाजवळी स्वयंचलीत मॅकेनिकल गेटवर ही ६ कोटी ८१ लाख रूपये ज्यादा मोजावे लागले आहेत. हे काम १९ कोटी १९ लाख रूपयांचे होते. मात्र, ते २६ कोटीत पडले आहेत.मखमलाबाद येथील हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमाचे मुळ प्राकलन १३२ कोटी १७ कोटी रूपये होते. मात्र, ते काम २०९ कोटी ५९ लाख रूपयांना पडले. म्हणजेच तब्बल ७७ कोटी रूपयांना पडल.
ही सर्व माहिती १८ जुलै २०१९ च्या इतिवृत्तात नमूद आहे. स्मार्ट सिटी कंपनीची कोटीच्या कोटी उड्डाणे संशयास्पद ठरत असून या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केली आहे.