नाशिक-स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना दिले असतानाच जाता जाता त्यांनी कंपनीत अनेकपदांची भरती सुरू केली आहे. त्यास सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठेके गाजत आहेत. अवघ्या एक किलो मीटर स्मार्ट रोडसाठी २१ कोटी रूपयांचा खर्च कंपनी करीत असून अलिकडेच स्काडा वॉटर मीटरसाठी काढलेल्या निविदा देखील वादग्रस्त ठरल्या आहेत. विशीष्ट ठेकेदारांवर मेहरबानी दाखववणे आणि स्मार्ट सिटी संचालकांना अंधारात ठेवणे त्यानंतर माहिती न देणे तसेच दुरूत्तरे करणे असे अनेक आरोप संचालकांनी केले आणि जो पर्यंत थविल यांची बदली होणार नाही तो पर्यंत बैठकीस येणार नाही अशी भूमिका संचालकांनी घेतली. ती अध्यक्ष सीतराम कुंटे यांनी मान्य केल्यानंतर आता थविल यांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांचा शोध सुरू असताना त्यांनी अनेकपदाची भरती सुरू केली आहे त्यामुळे जाता जाता भरती करण्याचा त्यांचा प्रयत्न वादगस्त ठरला आहे.
यासंदर्भात सभागृह नेता दिनकर पाटील यांनी यासंदर्भात अध्यक्ष सीताराम कुंटे आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे. त्यात थवील तसेच स्मार्ट सिटीचे अभियंता गुजर यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आपण त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. थवील यांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या काळात पारदर्शकपणे भरती होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना मुळ सेवेत पाठवावे आणि सीबीआय चौकशी करावी असे पाटील यांनी पत्रात म्हंटले आहे.