नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि.१३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या एकूण ४२० पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिकच्या उमेदवारांनी तहसीलदार व उद्योग उपसंचालक यांसारख्या महत्वाची पदे पादाक्रांत केली आहे. संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अटीच्या अधिन राहून शुक्रवारी (दि.१९) हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या या राज्यसेवा परीक्षेत नाशिकमधील विनायक गोपीनाथ घुमरे यांनी तहसीलदार पद प्राप्त केले असून ओझर येथील आकाश राजाराम दहाडदे यांनी उद्योग उपसंचालक पद मिळविले आहे.गंगापूररोड भागातील रोषण कैलास बुवा यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी पदी तर पेठ तालुक्यातील खडकी कुमठाळे येथील दत्ता बोरसे यांनी क्रीडा गटातून नायब तहसीलदार पद मिळवून यश संपादन केले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९ दि. १७ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरिता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरिता ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. त्यानंतर मुख्य परीक्षा दि.१३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी एक हजार ३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी चांगले तयार होत असून त्याचाच प्रत्येय गेल्या काही दिवसांपासून लागणाऱ्या निकालांवरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांनी व्यक्त केवी. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतील कामगिरी पाहाता नाशिक शहर स्पर्धा परीक्षांचे हब बनू पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.