नाशिक : सांयकाळी साडेपाच वाजेची वेळ.. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात वर्दळ सुरू असतानाच वाहनाच्या ठोकरेने जखमी झालेले कुत्रे अधिकच विव्हळू लागले. त्याच्या वेदनेने मात्र कोणाला कणव आली ना दु:ख झाले. उलट रस्त्याच्या मधोमध असलेल्या या कुत्र्याला उडवून गाड्या पुढे जाऊ लागल्या. कुत्र्यांचं जिणं त्याच्या नशिबी असे आले असताना ती मात्र देवदुतासारखी धावून आली. स्वत:च जायंबदी असताना तिने कुत्र्याला संरक्षण दिले आणि वाहनचालकांना जाणीव करून दिली. चौकातील मुलांमध्ये ती चेष्टेचा विषय ठरत असताना तिने त्याकडे दुर्लक्ष करून त्या जखमी कुत्र्याला अखेर एका प्राणिमित्र संस्थेकडे पोहोचवले. तिची ही कामगिरी मात्र सोशल मीडियाने थेट प्राणिमित्र तसेच केंद्रीय महिला तथा बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्यापर्यंत पोहोचली आणि कौतुकाची थाप त्यांनी दिली.शहरातील या घटनेने समाजातील निर्दयीपणा उघड झाला, परंतु कुठे तरी संवेदनशील मन जागृत असल्याचे दिसून आले. सोमवारी (दि.१८) सायंकाळी सिडकोत घडलेल्या मन विषण्ण झाले त्या मुलीचे नाव साक्षी दुबे. बीवायके महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकणारी साक्षीचा हात फॅक्चर असून, ती डॉक्टरांकडे जात असताना रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत असलेला कुत्रा बघून तिचे मन हळहळले. रस्त्यावरील वाहतुकीचा विचार न करता साक्षीने त्या कुत्र्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. ‘शरण’ या जखमी प्राण्यांना मदत करणाºया संस्थेला फोन केला आणि त्यांची मदत पोहोचेपर्यंत कुत्र्याला संरक्षण दिले. जखमी अवस्थेतील हे कुत्रे बाजूला ठेवण्याच्या अवस्थेतही नव्हते. अखेरीस पाऊण तासाने शरण संस्थेची मदत करणारी व्हॅन घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत साक्षीने खूपच वेगळे अनुभव घेतले. रस्त्यात उभ्या असणाºया साक्षीची काहींनी चेष्टा केली, तर काहींनी तो कुत्रा मरणारच आहे कशाला विनाकरण रस्ता अडवते, असा प्रश्न केला. परंतु ती तेथेच उभी राहिली.
प्राणी मित्र म्हणून काम वाढविण्याचा दिला सल्लाएका जखमी आणि मरणासन्न कुत्र्याला नेटाने वाचवल्यानंतर शरण या संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर त्याची माहिती पोस्ट केली, ती थेट मनेका गांधी यांच्यापर्यंत पोहोचली. दुपारी साक्षीला थेट दिल्लीवरून फोन आला आणि मनेका गांधी बोलणार असल्याचे सहायकाने सांगितले. काही क्षणातच मनेका गांधी बोलू लागल्या त्यांनी साक्षीचे कौतुक तर केलेच, परंतु नाशिकमध्ये प्राणिमित्र म्हणून काम वाढव, त्यासाठी काही मदत लागेल तर मदत करण्याचा सल्ला दिला. तसेच स्वत:चा व्यक्तिगत मेल आयडीही दिला. साक्षी प्राणिमित्र आहेच, परंतु मनेका गांधी यांच्या आश्वासक शब्दामुळे तिला पाठबळ मिळाले.