नाशिक : जगातील सर्वात गरीब व नवीन देश म्हणून ओळख असलेल्या दक्षिण सूडान या देशात गृहयुद्धाची स्थिती असून तेथे मानवधिकाराचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने संयुक्त राष्ट्र संघाकडून (यू.एन) परिस्थिती पुर्वपदावर आणून विस्कटलेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांती स्थापना दलात राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक येथे सहायक पोलिस आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या महिला एसीपी माणिक युवराज पतकी पतकी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जगातील हा सर्वात नवीन देश त्याच्या स्वातंत्र्यापासून सतत वांशिक संकटाला तोंड देत राजकीय अस्थिरतेतून मार्गक्रमण करत आहे. या देशातून मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाले असून बहुसंख्य लोकांनी संयुक्त राष्ट्राने या भागात उभारलेल्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. १९५६साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले असून तेव्हापासून लोकशाहीसाठी हा देश संघर्ष करताना दिसून येतो. या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने स्थापना केलेल्या शांती प्रस्थापित दलामध्ये विविध देशांचे सैन्य अधिकारी, पोलीस अधिकारी योगदान देत आहेत.
२०२२-२४ या वार्षिक गटाकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेत भारतभरातून ६९पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये माणिक पत्की यांचाही समावेश होता. महराष्ट्र पोलिस दलातून त्यांची एकमेव महिला अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ‘युनायटेड नेशन पिस किपिंग फोर्स’ या संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हे पोलिस अधिकाऱ्यांसाठी सर्वाेच्च मानाची बाब समजली जाते. या दलाच्या कामगिरीवर संयुक्त राष्ट्र संघाचे लक्ष असते. पतकी १वर्षाच्या कालावधीसाठी ५ जून २०२४पासून पुर्व आफ्रिकेमधील दक्षिण सूडान या देशात कर्तव्यावर रूजू झाल्या आहेत. त्यांची क्षेत्रिय अधिकारी या पदावर सूडानच्या जुबा शहरामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पती युवराज पतकी विशेष शाखा नाशिक शहर येथे पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहे.
२० वर्षांपासून पोलीस दलात!
माणिक पतकी या वीस वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावत आहे. त्यांनी आतापर्यंत मुंबई, सांगली या शहरांसह सीआयडी, सीबीआय नागूपर डी.टी.एस नाशिक येथे कर्तव्य बजावले आहे. त्या सध्या सहायक पोलीस आयुक्त या पदावर राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक येथे कार्यरत आहेत.