नाशिक : विभागीय क्रीडा उपसंचालक जयप्रकाश श्रीराम दुबळे (५४) यांना स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलातील कार्यालयात बेदम मारहाण करणाऱ्या पाच संशयितांना पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.५) सायंकाळी गणेशवाडी परिसरातून अटक केली़ विजय सुरेश लोखंडे (जयमल्हारनगर, मखमलाबादरोड), सागर नामदेव मोरे (रा. काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा), अमोल बाळासाहेब चांगले, गोविंद दत्तात्रय निपुंगळे व शुभम प्रकाश विरतकर (सर्व रा़ गणेशवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़
क्रीडा उपसंचालक दुबळे हे शनिवारी (दि़२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास विभागीय क्रीडा संकुलात काम करत असताना चार-पाच संशयितांनी काहीतरी कारणावरून कुरापत काढून दुबळे यांना बेदम मारहाण केली व फरार झाले़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
राजकीय वरदहस्त असलेल्या पंचवटी परिसरातील काही गुन्हेगारी टोळक्यातील सदस्यांनीच त्यांना मारहाण केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात होती़ त्यातच मंगळवारी सायंकाळी पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक यांना दुबळे यांना मारहाण करणारे संशयित गणेशवाडी परिसरातील असून, ते पुलाजवळ उभे असल्याची माहिती खबºयाने दिली़ त्यांनी ही माहिती तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली.
या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, सुरेश नरवडे, बाळा ठाकरे, संदीप शेळके, संतोष काकड, महेश साळुंखे, विलास चारोस्कर आदींनी गणेशवाडी पुलाजवळ सापळा रचून संशयित विजय लोखंडे, सागर मोरे, अमोल चांगले, गोविंद निपुंगळे व शुभम विरतकर (सर्व रा़ गणेशवाडी) यांना अटक केली.