नाशिक : देशातील शिक्षणावरील खर्चाची एकूण तरतूद पाहात ती अविकसित देशांपेक्षाही कमी आहे़ विद्यार्थ्यांना सक्तीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य तर मोफत शिक्षण हा पालक व पालकांचा हक्क असून त्यापासून शासनाला दूर जाता येणार नाही़ २०२० पर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहताना शिक्षणाची मात्र राखरांगोळी होत असून वंचितांना शिक्षण नाकारले जाते आहे़ भांडवलदार व धनदांडग्यांच्या हाती शिक्षण देऊन शिक्षणाचे कंपनीकरण केले जात असून ते धोकेदायक असल्याचे प्रतिपादन अॅक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी सोमवारी (दि़१९) केले़
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे सोमवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते़ चासकर पुढे बोलताना ते म्हणाले की, केवळ शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचे सुतोवाच शासन करते, मात्र सर्वच शाळा या दर्जाच्या करणे शासनाचे कर्तव्य आहे़ सद्यस्थितीत शिक्षणाची परिस्थिती ही शिक्षक आॅनलाईन तर शिक्षण सलाईनवर अशी झाली आहे़ आजचे शिक्षण हे पुन्हा मजुर, कामगार निर्मितीकडे जात असल्याचे सांगत शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे जबरदस्तीने करून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले़
जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते राज्यस्तरील सात शिक्षिका तर जिल्हास्तरीय २७ शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला़ तसेच जिल्हा परिषदेच्या गंगाम्हाळुंगी शाळेतील सात विद्यार्थ्यांनी चीनी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला़ आमदार नरहरी झिरवाळ यांनी शिक्षकांना सुविधा द्या त्यानंतर आॅनलाईनच आग्रह धरा तसेच या सुविधांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ तर संघटनेचे राज्य अध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी सद्यस्थितीतील शिक्षण पद्धतीत शिक्षकांची होत असलेली हेळसांड व त्यासाठी लढा उभारण्याची तयारी असल्याचे सांगितले़
या सोहळ्यास शिक्षणअधिकारी वैशाली झनकर, मनपा शिक्षणाधिकारी नितीन उपासणी, नगरसेवक राहुल दिवे आदींसह मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा सरचिटणीस बाबुलाल सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास बोढारे , बापू गरुड, प्रेमचंद गांगुर्डे व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले़ सूत्रसंचालन सिद्धार्थ सपकाळे व जयश्री खरे यांनी केले़राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकवैशाली भामरे (हाताणे), गितांजली भोये (आंबेगण),सुवर्णा लहिरे (प्रवरानगर), मंजुषा स्वामी (हिंगलजवाडी), वैशाली भोईर (आसनगाव) यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार तर क्रांतीकुमार जाधव, वैभव गगे, कुंदन दाणी, संजय भामरे, शोभा दाणी, सुभाष बेलदार, संभाजी अनुसे,राजेश अमृतकर, सुनील कुटे, प्रमिला पगार,मीना शेवाळे, दत्तू कारवाई, संतोष चव्हाण, रामदास भोये, मंगला गवारे, शारदा पवार, शिवाजी शेवाळे, गंभीर अहिरे, माणिक भालेराव, योगेश सूर्यवंशी, मंगला गायकवाड, संजीवनी जगताप, संजय सातपूते, प्रशांत गाजुल, मनोरमा सोनवणे, कल्पना पवार, हौसिराम भगत, विठ्ठल नागरे या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला़